उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

0

मुंबई,दि.15: राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्यचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. या पत्रातून राज यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचं सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका असंही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ही भेट झाली आहे. 

शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजप सत्तेत आली मात्र मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पत्र लिहून फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती.

त्यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आजची भेट ही सदिच्छा भेट होती की, राजकीय रणनीती आखणारी होती, हे येणारा काळच सांगेल.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ हे नवीन घर बांधलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी तिथे जाऊन पाहुणचार स्वीकारला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री वाढलेली दिसते. आता शिवसेनेचा एक गट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा होते, याची उत्सुकता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here