Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र कर्नाटक वादावर मोठं वक्तव्य

संपूर्ण विषय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले

0

मुंबई,दि.६: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र कर्नाटक वादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद, महाविकास आघाडीचा मोर्चा या मुद्यांवर भाष्य केलं. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली असून यावरून आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक वादावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? | Devendra Fadnavis On Maharashtra Karnataka Border Dispute

मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बसवराज बोम्मईंनी या बाबतीत कोणालाही पाठिंबा देणार नाही, असं सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. राज्याराज्यांमध्ये हे वातावरण व्हायला लागलं तर योग्य नाही. राज्यघटनेनं आपल्याला कोणत्याही राज्यात जाऊन राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळं कोणी रोखू शकत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे. हे प्रकरण अमित शाहांना सांगणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र न्यायप्रियतेसाठी ओळखलं जातं: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र न्यायप्रियतेसाठी ओळखलं जातं. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं. जे कुणी वाहनं रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर ही सुरुवात झाली आहे. सीमाभागातील नागरिक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर कर्नाटककडून त्याची रिॲक्शन येऊ लागली. प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कायदा हातात घेणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांना कर्नाटकमध्ये जाण्याची वेळ येणार नाही

शरद पवार यांना ४८ तासात कर्नाटकमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे की क्रियेला प्रतिक्रिया दिली तर हे प्रकार वाढत जातील. त्यामुळं तसं करु नये, असं फडणवीस म्हणाले. कर्नाटकच्या सरकारची जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय करु नये, असं फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशासाठी आदर्श

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. कुणाच्या वक्तव्यानं, कुणाच्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानं शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं निमित्त करुन हा मोर्चा काढण्यात येत आहे. यांची नाराजी वेगळी असल्यानं ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यपालांनी स्वत: माझ्यासाठी शिवाजी महाराज आदर्श आहेत असं सांगितलं असल्याचं फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here