सोलापूर,दि.3: अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अर्थसहायाचे आश्वासन देण्याबरोबरच राज्य शिखर बँकेकडून थकीत कर्जापोटी सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय होते. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचारही सुरू केला होता. दरम्यान, राज्य सरकारने शिखर बँकेच्या माध्यमातून थकीत कर्जापोटी पाटील यांचा कारखाना सील केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडवणीस सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी अभिजित पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या कारखान्याला थकीत कर्जापोटी मदत करण्याचे प्रलोभन दाखवत सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साखर कारखाना सभासदांच्या बैठकीत महायुतीला मतदान करण्याचा ठराव देखील केला आहे. निवडणूक काळात फडणवीस यांनी दबावतंत्राचा वापर करून एक प्रकारे आमिष व प्रलोभन दाखविले आहे.
हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. सत्तेमध्ये असलेल्यांना निवडणूक काळामध्ये अशा प्रकारचे कोणतेही अभिवचन अथवा आश्वासन देता येत नाही. मात्र, सर्व नियम धाव्यावर बसवून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.
ही निवडणूक मोदीविरुध्द जनता अशी
ही निवडणूक मोदींविरुध्द राहुल गांधी नसून ती मोदीविरुध्द जनता अशीच आहे. आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली. या पत्रकार परिषदेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार वझाहत मिझां, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हतुरे, प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेव फुलकणी, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे उपस्थित होते.
भाजपमध्ये सक्रिय गुंडांना संरक्षण
सोलापूर शहरात भाजपमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांना संरक्षण दिले जात आहे. मात्र, विरोधी पक्षातील गुंडांवर तडीपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. भाजपकडून सत्तेचा अशाप्रकारे दुरुपयोग केला जात असून हा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही. याबाबत मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो असून हा प्रकार थांबविला नाही तर आपण याबाबतही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. भाजपचे हे कृत्य म्हणजे ते या निवडणुकीत घाबरलेले आहेत, हे दिसून येते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.