मीही ती गोष्ट जनतेसमोर आणणार दीपक केसरकर यांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान

0

मुंबई,दि.२८: शिवसेना बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मी पूर्वीच आमची पॉलिसी जाहीर केली आहे, की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही. कारण ते आमचे नेते आहेत आणि आम्हाला प्रीय आहेत, आम्हाला त्यांचा आदर आहे. मात्र, जे मुद्दे उपस्थित केले जातील, त्या मुद्द्यांचे मी नक्कीच उत्तर देईन. जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी मीडियासमोर आणणार असाल आणि आरोप करणार असाल, तर मला जाहीर आव्हान करायचे आहे, मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट ‘या’पेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे.

पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही. पण येत्या दोन दिवसांत ही गोष्ट मी अवश्य जनतेसमोर आणणार, असे आव्हान आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

केसरकर म्हणाले, “मुंबईच्या महापौरांनी एक ट्विट केले आहे, की केसरकरांनी आपल्या नातवासाठी काय केले ते विसरू नये. पण, मी शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता आहे. यामुळे माझ्यासाठी काही विशेष केले आहे की काय, असे काही लोकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, की माझ्या नातवाला एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळावा. मात्र, ते ॲडमिशन करून देऊ शकले नाही. त्यांनी मला सांगितले, की त्या ऐवजी मुंबईतील एका स्कूलमध्ये मी तुला ॲडमिशन घेऊन देतो आणि त्यांनी ते घेऊन दिले. यासाठी मी त्यांचे आभारही मानले.

माझा नातू एक वर्षभर तेथे राहील आणि आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी इंटरनॅशनल स्कुलमध्ये अर्ज करू आणि तो रितसर इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाईल. त्यासाठी मी पुन्हा यांच्याकडे विनंती करणार नाही. कारण आम्ही जेव्हा हजारो लोकांची पर्सनल कामे करत असतो, तेव्हा ते आम्ही सार्वजनिक बोलत नाही. कारण या छोट्या छोट्या गोष्टी असतात. 

एखाद्या शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश, या गोष्टी आम्ही रोज करत असतो. पण एवढ्या छोट्या गोष्टी जर तुम्ही मीडियासमोर आणणार असाल आणि आरोप करणार असाल, तर मला जाहीर आव्हान करायचे आहे, की जसे तुम्ही माझ्या ॲडमिशनसाठी, भलेही तुम्ही मला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन मिळवून देऊ शकला नाहीत. लोकल स्कूलमध्ये मिळवून दिले. यासाठी मी तुमचा आभारी आहे. पण मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही.

पण येत्या दोन दिवसांत ही गोष्ट मी अवश्य जनतेसमोर आणणार. कारण आदित्य ठाकरे यांनी माझ्या मतदार संघात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अवश्य जावे. पण मी जे केले आहे, ते बघितल्यानंतर मी निश्चतपणे बोलेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला कळेल, की जे सांगितले जाते, की आदित्यंवर आरोप झाले, मातोश्रीवर आरोप झाले, पण कुणीही काही केले नाही. हे जे बोलले जाते, याचे उत्तर तुम्हाला मिळेल. 

सेना आणि भाजप संबंधांसंदर्भातील उत्तर तुम्हाला त्यातून मिळेल. कारण आम्ही अनेक गोष्टी आदरापोटी बोलत नसतो. पण तुम्ही असे बोलणार असाल, तर आम्हालाही ते बोलता येते. म्हणून, कुणी तरी मोठी व्यक्ती आहे. मोठ्या व्यक्तीशी संबंधित आहे आणि कोण सामान्य? आमच्यासारखी लोक सामान्य असतात. पण लोकशाहीत आम्हाला तेवढाच अधिकार दिला आहे आणि तो अधिकार आम्हाला जनतेने आणि आमच्या घटनेने दिला आहे. त्यामुळे आम्हीही बोलू शकतो. त्यामुळे तसे बोलायची पाळी आम्ही नाही आणली. तुम्ही आणली आहे. म्हणून ते बोलायला लागेल. ही वस्तुस्थिती आहे,” अशा शब्दात केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here