आदित्य ठाकरे यांनी कसं वागावं, बोलावं यासाठी वडिलांचं उदाहरण घ्यावं: दीपक केसरकर

0

मुंबई,दि.22: आदित्य ठाकरे यांनी कसं वागावं, बोलावं यासाठी त्यांनी वडिलांचं उदाहरण घ्यावं असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे, संदीपान भुमरे आणि संजय राठोड उपस्थित होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या शिवसंपर्क अभियानातून बंडखोरांवर जोरदार निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार असा उल्लेख करत शिवसेना आमदांना लक्ष्य केलं जात आहे.

आदित्य ठाकरेंनी वडिलांचं उदाहरण घ्यावं

“आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसं वागावं, बोलावं यासाठी त्यांनी वडिलांचं उदाहरण घ्यावं. ते जर इतर नेत्यांसारखं बोलू लागले तर हे प्रकरण अजून चिघळेल. ते माझ्यापेक्षा निम्या वयाचे आहेत. पण ते जेव्हा येतात तेव्हा मी उठून उभा राहतो. कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाहीत असं नाही,” असा इशारा केसरकरांनी दिला.

“आम्हा शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार,” असा इशारा केसरकरांनी यावेळी दिला.

“आम्ही तुमच्या आदरापोटी शांत आहोत. बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुमच्या रक्तात शिवसेना आहे. पण यांच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवेसना आणली आहे. त्यामुळे तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकाचा अपमान करु नका. आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला. कोर्टात जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहोत,” असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिल्याचं वृत्त मी वाचलं. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत.

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे खरं आहे की खोटं समोर आलं पाहिजे. हर्षल प्रधान यांनी हे खोटं आहे असं सांगितलं. पण तसं असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा. त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल, तर नक्की तसं घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही हे मला माहिती आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. जर शिंदेंना बाजूला करुन युती करायची असेल, तर मग भाजपाला नकार का देत होतात? अशी विचारणाही केसरकरांनी केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं

“शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेब एकवचनी होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण ते मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड केलं नाही, ते शांत राहिले. आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना भेटायला बोलावलं होतं आणि माझं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देतो सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. यातून त्यांची एकनिष्ठता दिसते. मुख्यमंत्रीपद नको, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा. ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. भाजपासोबत युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री व्हा असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांची बदनामी का केली जात आहे? तुम्हाला आघाडी तोडावीशी का वाटली नाही याचं उत्तर द्या,” अशी विचारणा केसरकरांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here