सोलापूर,दि.8: सोलापूर शहरातील श्री गणेशमूर्ती विसर्जनावरून दत्तात्रय पिसे यांनी सोलापूर महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. श्री गणेश मूर्ती विसर्जन केल्याने पाणी प्रदूषित झाल्याचा कोणताही इतिहास नाही. तरी श्री संभाजी महाराज तलाव, तसेच सिद्धेश्वर तलाव यांठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यास बंधने घातलेला आदेश त्वरित रहित करावा. अन्यथा गणेश भक्तांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी कायदेशीर नोटीस येथील दत्तात्रय पिसे यांनी त्यांचे अधिवक्ता संतोष न्हावकर यांच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्तांना दिली आहे.
नोटीशीमध्ये म्हटले आहे की, शहरातील तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने पाणी प्रदूषित झाल्याचा कोणताही पूर्वीचा इतिहास नाही. प्रशासनाने 3 फूटांपेक्षा अधिक उंची असलेल्या मूर्ती छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, तसेच कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. हिप्परगा तलाव शहराबाहेर असल्याने प्रत्येक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती श्री गणेशमूर्ती तेथे जाऊन विसर्जन करणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे प्रशासन अधिकारांचा वापर करून नागरिकांना श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्ये आणि हिप्परगा दगडी खाणीमध्ये करणे बंधनकारक करू शकत नाही.