Dagadi Chawl 2 Trailer: बहुचर्चित ‘दगडी चाळ 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

दि.11: Dagadi Chawl 2 Trailer: प्रसिद्ध डॉन अरुण गवळी (Arun Gawali) यांच्यावर आधारित दगडी चाळ (Dagadi Chawl) चित्रपट सुपरहिट झाला. चित्रपटातील डॉन अरुण गवळी यांचा चुकीला माफी नाही हा डायलॉग जबरदस्त गाजला. अभिनेते मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘दगडी चाळ 2’ या चित्रपटाच्या पोस्टरचे आणि ट्रेलरचे अनावरण दगडी चाळीत अरुण गवळींच्या हस्ते करण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा Dagadi Chawl 2: सलमान खानने ‘दगडी चाळ 2’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्छा

या ट्रेलरच्या सुरुवातीला दगडी चाळ या चित्रपटाच्या पहिल्या भागातील काही जुनी दृश्य दाखवण्यात आली आहेत. मात्र ‘दगडी चाळ 2’ मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडला आहे. तो एक साधं सरळ आयुष्य जगताना दिसत आहे.

तर दुसरीकडे डॅडी मात्र अडचणीत सापडले आहे. त्यानंतर डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले, ज्यामुळे सूर्या डॅडींचा तिरस्कार करु लागला. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला, हे चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे.

मुंबईतील गॅंगवॉरमधील मोठे नाव म्हणून ‘अरुण गुलाब गवळी’ उर्फ ‘डॅडी’ यांना ओळखले जाते. त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले, तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले होते. या चित्रपटातील चुकीला माफी नाही हा डायलॉग अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात ‘चाळीचे दरवाजे इतके कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील’, ‘चाळ काही विसरत नसते’, ‘चुकीला माफी नाही’ असे विविध डायलॉग समोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर फारच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ येत्या 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याची माहिती अद्याप समोरआलेली नाही. मात्र या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here