मुंबई,दि.२: क्रिकेटर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ (Video) शेअर केला होता. गुजरात निवडणुकीच्या (Gujrat Election) पार्श्वभूमीवर रविंद्र जडेजाने व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. रविंद्र जडेजाने याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत गुजराती बांधवांना सल्ला देणारा बाळासाहेबांचा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला. आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
मी तो व्हिडिओ बघितला आहे, ज्या पद्धतीने तो व्हिडिओ घेतला गेला, त्याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने काहीच होत नाही, काही जरी झालं तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची गरज लागते. निवडणुका गुजरातच्या असो, वा महाराष्ट्राच्या असो, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे या नावाचीच लागते, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं.
नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मिळत नाहीत, याची खात्री झाल्यावरच जाडेजासारख्या लोकांना बाळासाहेब यांचे नाव घ्यावे लागते, हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांची गुजरातमध्ये हार आहे, असा टोलाही अंधारेंनी लगावला.
रविंद्र जडेजा पत्नीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. पत्नी रिवाबा जाडेजासाठी त्याने जोरदार प्रचार केला आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपने रिवाबा यांना तिकीट दिले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर
बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ काल रवींद्र जाडेजाने शेअर केला आहे. आता गुजरातींनी एक गोष्ट समजून घेण्याची वेळ आली आहे. ‘नरेंद्र मोदींचे सरकार गुजरातमधून गेले, तर गुजरात गेले’ असे बाळासाहेब या भाषणात म्हणाले होते.
काय म्हणाले होते बाळासाहेब?
माझं म्हणणं इतकंच आहे, नरेंद्र मोदी गेले, गुजरात गेलं, हे माझं वाक्य आहे, जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलंत, तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी लालकृष्ण अडवाणींपाशी बोललेलो आहे.