Covid-19: टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी कोरोना आणि लसीबद्दल दिली महत्वाची माहिती

0

मुंबई,दि.१६: कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत (Covid Third Wave) रुग्ण संख्या वाढत आहे. सरकारने बूस्टर डोस देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. ६० वर्षावरील नागरिकांना व फ्रन्टलाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. बूस्टर डोस देण्यात आल्यानंतर किती काळ त्याचा प्रभाव राहणार आहे. बूस्टर डोस नंतर परत लस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक लस हे कोरोनाविरोधातील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. या विषाणूत जनुकीय बदल होत असल्याने त्याप्रमाणे लसीमध्येही बदल होतील, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, यापूर्वी  स्वाइन फ्लू, सार्स कोविड या आजारांतही विषाणूचे म्युटेशन होत राहते. त्याप्रमाणे कोविडच्या बाबतीतही दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने लस घ्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रसार अधिक आहे किंवा जे घटक संसर्गाच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात येतात अशा व्यक्तींना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल.

आता कोरोनाची लाट आहे; परंतु ज्यावेळी एन्डेमिक म्हणजेच अंतर्जन्य आजार होईल, तेव्हा लसही बदलेल, जुनी लस उपयुक्त ठरणार नाही. राज्यात पहिल्या टप्प्यात चांगले लसीकरण झाले. लहानग्यांसाठी तोंडावाटे देण्यात येणारा लसीचा डोस आला तर त्यात आपण लगेच गती पकडू शकतो. बूस्टर डोसविषयी अजूनही सामान्यांची मानसिकता सकारात्मक नाही, कोरोना गेला आहे अशा भ्रमात सर्व आहेत. तसे न करता ही मात्रा घ्यायला हवी.

प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनाचा धोका कमी असतो. लसीमुळे कोरोना होत नाही हा गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. आता शास्त्रीय व वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, लसीकरणामुळे कोरोनाच्या आजाराची तीव्रता कमी होते. रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही किवा गंभीर स्वरूप घेत नाही, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

राज्यात लसीकरण मोहिमेच्या प्रत्येक टप्प्याला संमती मिळण्यासाठी काहीसा उशीरच झाला आहे. त्यामुळे ज्या तुलनेत लसीकरणाने वेग धरावा त्या तुलनेत आपल्याला यश मिळाले नाही. समाजात जास्तीत जास्त लसीकरणाला प्राधान्य द्यावे याकरिता लस साक्षरता गरजेचे असल्याचे या निमित्ताने दिसून आले. त्यामुळे यंत्रणांनी त्यावर काम करायला हवे.- डॉ. अविनाश भोंडवे, राष्ट्रीय अधिष्ठाता इंडियन मेडिकल असोसिएशन कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here