औरंगाबाद,दि.२: कोरोनाची कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटचेही (Omicron Variant) रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसातील राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यातच आता राज्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा करोनाचे आकडे वाढतांना पाहायला मिळत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी सुद्धा अशीच काही चिंता वाढवणारी ठरत आहे. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यनंतर औरंगाबादची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासूनची आकडेवारी पुन्हा एकदा वाढतांना पाहायला मिळत आहे. २८ डिसेंबरला जिल्ह्यात ०९ रुग्णांची भर पडली, २९ डिसेंबरला वाढून रूग्ण संख्या १६ झाली, ३० डिसेंबरला पुन्हा १६ रुग्ण आढळून आले. ३१ डिसेंबरला वाढून १८ रुग्ण आढळून आले. तर १ जानेवारीला हा आकडा थेट २६ वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
शहरात गर्दी
औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अनेक भागात होत असलेली गर्दी वाढत्या करोनाच कारण ठरत आहे. या भागात खरेदीसाठी लोकांची रोज मोठ्याप्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. त्यामुळे ही गर्दी अशीच राहिली तर कोरोनाचा आकडा आत्तापेक्षा आणखी वाढू शकतो यात काही शंकाच नाही.
तूर्तास लॉकडाऊन नाही
राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी तूर्तास लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, त्या दिवशी लॉकडाउन लागू होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत लॉकडाउनचा कोणताही विषय नव्हता, असा खुलासा केला.