मतमोजणी ३ डिसेंबरला असताना उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या

0

भोपाळ,दि.२८: देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरु आहेत. काही राज्यांत मतदान व्हायचे आहे. येत्या ३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. परंतू, मध्य प्रदेशमधून धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. मतमोजणीला सहा दिवस शिल्लक असताना काल म्हणजेच २७ नोव्हेंबरलाच स्ट्राँग रुममध्ये पोस्टल बॅलेट उघडून मते मोजण्यात आली आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना स्ट्राँग रुममध्ये पोस्टाने पाठविण्यात आलेली मते मोजताना आणि ती वेगळ्या पिशव्यांमध्ये भरताना पकडण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये काहीजण याचा जाब या अधिकाऱ्यांना विचारताना ऐकायला येत आहे. 

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बालाघाटचा असल्याचे सांगितले जात आहे. बालाघाटचे कलेक्टर डॉ. गिरीश कुमार मिश्रा यांनी स्ट्राँगरुममधून पोस्टल मते बाहेर काढून त्यात हेराफारी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांसह यामध्ये सापडलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाचे कार्य प्रभारी जे.पी. धनोपिया यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. बालाघाटचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश कुमार मिश्रा यांनी पोस्टल मते स्ट्राँग रूममधून बाहेर काढून पोस्टल मतांशी छेडछाड करण्याचे अनधिकृत कृत्य केल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here