राज्यातील पेट्रोल व डिझेल दरकपाती नंतर काँग्रेसने भाजपाचा व्हिडिओ शेअर करत केली टीका

0

मुंबई,दि.14: राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

राज्य सरकारने केलेल्या या दर कपातीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत भाजपला त्यांच्या जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये 50 टक्के कपातीची मागणी भाजपने केली होती. या मागणीचे काय झाले, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. 

यासंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपला जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. ट्विटद्वारे ते म्हणाले की,  शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे पाच रुपये आणि तीन रुपये एवढीच कपात केली, याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण व्हॅटवर 50 टक्के कपात करा म्हणजे एकूण पेट्रोलवरील 32.55 पैकी पैकी 16.28 रुपये आणि डिझेल वरील 22.37 रुपयांपैकी 11.19 रुपये कमी करा, अशी भाजपाची मागणी होती, त्याचे काय झाले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सचिन सावंत यांनी ट्विट करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. 

याचबरोबर, सचिन सावंत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली आहे. केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा 10 रुपयांनी जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय असा प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला. तसेच, राज्यात कर कपात केल्यानंतरही गुजरात आणि कर्नाटकमधील दर कमी असल्याची आठवणही सचिन सावंत यांनी करून दिली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here