नवी दिल्ली,दि.30: काँग्रेसचा महाविकास आघाडीचा जागावाटपावर फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी 23 जागांची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी शिवसेना 23 जागांवर ठाम असल्याचे सांगितले आहे. अशातच काँग्रेसचा जागावाटपावर फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार नवी दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीच्या काँग्रेस बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस 22, शिवसेना ठाकरे गट 18, राष्ट्रवादी शरद पवार गट 6 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 2 जागा सोडण्यात येतील. हा फॉर्म्युला काँग्रेसकडून समोर आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या 48 जागा मोठ्या ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट
प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात (दि.25) मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे. म्हणजे लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार असं मोघम ठरलं होतं. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.