समर्थ बँकेची बदनामी करणाऱ्या विरूध्द पोलीसांकडे तक्रार

0

सायबर पोलीसांकडून तपास करून कारवाई करणार – पोलीस आयुक्त अंकुश शिंदे

सोलापूर,दि.७: सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सहकारी बँक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समर्थ सहकारी बँकेची बदनामी करून ग्राहकांमध्ये भिती निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरूध्द समर्थ बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली असून या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी तातडीने सायबर क्राईम विभागाकडून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, संचालक पंचागकर्ते मोहन दाते, ॲड. श्रीकृष्ण कालेकर, प्रशांत बडवे, व्यवस्थापक आनंद एकबोटे उपस्थित होते.

अर्थ करी समर्थ हे ब्रीद घेवून अवघ्या काही वर्षात नावारूपाला आलेल्या समर्थ सहकारी बँकेने आजपर्यत अनेकांना आर्थिक पाठबळ देवून उभं करीत सामर्थ्य दिले आहे. लहान व्यवसायिक असो की मोठा उद्योगपती, सर्वसामान्य नागरीक असो की नोकरदार व्यक्ती, प्रत्येकाला कर्ज देवून किंवा ठेवीवर चांगले व्याज देवून आर्थिक सक्षम करण्याचे काम समर्थ बँकेने आजपर्यत यशस्वीपणे केले आहे. बँकेच्या प्रत्येक ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आणि खातेदार यांचा विश्वास सार्थ ठरवणारी समर्थ सहकारी बँक सोलापूर शहरासह राज्यातील अनेक शहर जिल्ह्यात आपल्या शाखांच्या माध्यमातून यशस्वीपणे कार्यरत आहे. उत्तम सेवा देणारे कर्मचारी आणि बँकेला प्रगतीचा मार्ग दाखवणारे संचालक यांच्यामुळे बँकेने मोठी भरारी मारली आहे. कोरोनाच्या महामारीतही आपले जीव धोक्यात घालून अविरत सेवा देवून ग्राहकांना सेवेतून संतुष्ट करण्याचे काम समर्थ बँकेने केले आहे. म्हणूनच समर्थ बॅँकेने यशाचे शिखर गाठलेले आहे.

परंतु काही दिवसापासून काही समाजकंटकाकडून समाजमाध्यमांमधून (सोशल मिडिया व्हॉटसॲप मधून ) बँकेची बदनामी होईल अशी पोस्ट व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे. त्यावरून बँकेच्या प्रशासनाकडून तातडीने सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार देवून सोशल मिडियावरील पोस्टची प्रत देण्यात आली. त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करून घेण्यात आली. या पोस्टची गंभीर दखल पोलीसांनी घेतली आहे तसेच यापुढेही काही पोस्ट आल्या तर त्याच्यावरही कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक बहीरट यांनी दिले.

अफवा पसरवणाऱ्या विरूध्द पोलीस कारवाई करीत आहेत.

बँकेच्या ग्राहक आणि खातेदारांनी मनात कोणतीही भिती बाळगू नये सोशल मिडियाचा गैरवापर करून काहीजण बँकेबाबत गैरसमज पसरवत आहेत त्याला बँकेच्या ग्राहक आणि खातेदारांनी बळी पडू नये, बँकेच्या ग्राहक खातेदारांचे नुकसान होवू नये म्हणून बँकेने पोलीसांकडे तक्रार दिली आहे. बँक आर्थिक सक्षम आहे. – दिलीप अत्रे अध्यक्ष समर्थ सहकारी बँक

समर्थ सहकारी बँकेच्या अधिकारी व संचालकांनी निवेदन दिले आहे.

समर्थ सहकारी बँके विरूध्द अफवा पसरवून सोशल मिडियावर बदनामी करीत असल्याबाबतचे निवेदन बँकेच्या अधिकारी आणि संचालकांनी दिले आहे. त्यावरून तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. तसेच सायबर विभागाकडून याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल – पोलीस आयुक्त अंकुश शिंदे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here