नवी दिल्ली,दि.5: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) हे अत्यंत वक्तशीर आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड हे शिस्तप्रिय आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारे आहेत. “माफ करा, मला उशीर झाला…”, असे म्हणत ज्या व्यक्तीने माफी मागितली आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आहेत. कोर्ट रुममध्ये फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यावर धनंजय चंद्रचूड यांनी हे मोठे मन दाखवून दिले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अत्यंत वक्तशीर आहेत आणि त्याचे पालन करून ते इतर न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकार्यांना त्यांच्या कर्तव्याचा मोठा संदेश देत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये मागितली माफी | CJI D Y Chandrachud
द वीकमधील (The Week) वृत्तानुसार, एक दिवस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोर्टरूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर जेव्हा ते कोर्टरुमध्ये आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली, असे सांगितले जात आहे. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “माफ करा, मी सहकारी न्यायमूर्तींसोबत काहीतरी चर्चा करत होतो… त्यामुळे उशीर झाला.” दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी इतक्या विलंबाबद्दल माफी मागणे काही सामान्य गोष्ट नाही.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी एका मीडिया ग्रुपला दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आठवण करून दिली आणि सांगितले की, ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. इतरांनी वेळेची पूर्ण काळजी घेऊन न्यायालयात पोहोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे इतर सहकारी न्यायाधीशही सुद्धा म्हणतात की, ते सत्य सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतमुख सत्य सांगतात. त्यांची ही खासियत त्यांना सर्वात वेगळी आणि अत्यंत साधी-साधी मनाची व्यक्ती बनवते.
दरम्यान, धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. मागील काही काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव वारंवार चर्चेत आले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या रोखठोक व मिश्कील अशा दोन्ही बाजू सर्वसामान्यांनादेखील भावल्या आहेत. अलीकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या कामांचा आणि सुट्ट्यांचा हिशेब मांडला होता. न्यायाधीश वर्षातले 200 दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले होते.