मुंबई,दि.२: मध्य-पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. इराणने अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, आता चीनने इराणची उघडपणे पाठराखण करत या वादात उडी घेतली आहे. चीनच्या या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (China support to Iran)
चीनने इस्रायलला सुनावले; इराणच्या सार्वभौमत्त्वाचा मुद्दा उपस्थित
चीनने या युद्धावर आपली अधिकृत भूमिका मांडताना इस्रायल आणि अमेरिकेच्या कारवायांचा तीव्र निषेध केला आहे. चीनच्या मते:
• सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करणे किंवा त्यांची हत्या करणे हे इराणच्या सुरक्षेचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे सरळ उल्लंघन आहे.
• UN च्या नियमांची पायमल्ली: इस्रायलचे कृत्य संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सिद्धांतांच्या विरोधात असून यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध धोक्यात आले आहेत.
• युद्धबंदीचे आवाहन: चीनने लष्करी कारवाया तातडीने थांबवून मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
चीनचा खुलासा: इराणला क्षेपणास्त्रे पुरवल्याचा दावा चीनने फेटाळून लावला असून, अशा प्रकारचा कोणताही लष्करी व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.








