बच्चू कडू-रवी राणा वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.३१: बच्चू कडू-रवी राणा वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यात वाद सुरू झाला. आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना या वादावर भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

“राणा आणि कडू यांच्यात वाद नसून तो गैरसमज आहे. आम्ही तो गैरसमज दूर करु. ५० खोके बोलणं चुकीचं आहे. कुठेतरी २७ कोटी पकडले तर एक ट्रक लागला, म्हणजे ५० कोटींना दोन ट्रक लागतील. मग ५० आमदारांच्या ५० कोटींना किती ट्रक लागतील याचा विचार करा. ते ट्रक कुठे आहेत? मी कोणालाही पैसे दिलेले नाहीत. सगळे स्वत:हून माझ्यासोबत आले आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

बच्चू कडू-रवी राणा वाद

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाक् युद्ध सुरू आहे. रवी राणांनी बच्चू कडूंवर केलेल्या आरोपानंतर या वादाला सुरुवात झाली. बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असं आव्हानच दिलं आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. मेळघाटातील धारणी येथेही त्यांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचले. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.

“रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “१ तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.

“कार्यकर्त्यांचे मेसेज येत आहेत. तुमचा इतका अपमान होत आहे, तुम्ही इतकी बदनामी सहन केली, सत्ताधारीच अशा प्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही”, असं बच्चू कडूंनी सांगितलं. “राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here