मुंबई,दि.13: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वपक्षीय आमदार खुश होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यावेळी शिंदे गटातील अनेक आमदारांनी आपल्याला पुरेसा निधी मिळत नव्हता असे म्हटले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी मिळत असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. पुरेसा निधी मिळत नसल्याने आपल्या मतदार संघातील कामे होत नसल्याचे अनेक आमदारांनी सांगितले होते.
या समस्येवर आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील आपली उद्विग्नता व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यांनी आपल्या भूमिकेकडे लक्ष दिलं नाही. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्याला झालेल्या त्रासाची दखल घेत नगरविकास खात्यातून निधी दिला, असं शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचं मत होतं. आमदारांच्या याच भावनांची जाणीव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठेवली आहे. त्यातूनच त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय फक्त त्यांच्या समर्थक आमदार किंवा भाजप आमदारांसाठी घेतलेला नाहीय, तर सर्वपक्षीय आमदारांसाठी घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार विकास निधीसाठी तब्बल 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सगळे आमदार खूश होण्याची शक्यता आहे.