मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत, शिवसेनेला बसणार आणखी एक धक्का?

0

नवी दिल्ली,दि.9: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत.

शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल (शुक्रवार) झालेल्या विशेष भोजनामध्ये शिवसेनेचे 10 खासदार उपस्थित होते. यावेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे 10 खासदार उपस्थित होते. भाजपाचा एक ज्येष्ठ नेताही यावेळी उपस्थित होता, अशी माहिती आहे.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी 8 खासदार या भोजनाला उपस्थित होते, अशी माहिती आहे. एकूण 15 खासदार शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये सहभागी होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या शिवसेनेच्या बंडाचे पडसाद दिल्लीतही उमटणार हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी शिवसेने मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील या फुटीनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटामध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. आगामी काही दिवसांमध्ये याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here