ऑनलाईन पेमेंटची बदलणार पद्धत, अशी असणार नवीन पद्धत

0

दि.21 : अलीकडच्या काळात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. कोरोना नंतर अनेकांनी डिजिटल व्यवहारावर भर दिला आहे. ऑनलाईन व्यवहारात अनेकवेळा फसवणुकीचे प्रकार घडतात. येणाऱ्या नव्या वर्षात तुमचं ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे. RBI ने ऑनलाईन पेमेंटसाठी 1 जानेवारी 2022 पासून कार्ड टोकेनायजेशन प्रणाली (Tokenization System) लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. नव्या व्यवस्थेत आता ऑनलाईन पेमेंटसाठी टोकन सिस्टम असणार आहे. याअंतर्गत व्यवहारादरम्यान कार्ड नंबर, सीवीवी इत्यादीचा वापर केला जाणार नाही. त्याजागी एक टोकन नंबर जनरेट केला जाईल. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, कार्ड होल्डरची माहिती थर्ड पार्टीकडे स्टोर होणार नाही. सध्या अनेक ऑनलाईन शॉपिंग पोर्टल फास्ट ट्रान्झेक्शनसाठी कार्ड होल्डरचे कार्ड डिटेल्स सेव्ह करतात. यामुळे अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात युजरचा डेटा लीक आणि फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. या नव्या टोकेनायजेशनमुळे जोखिम कमी होईल, असा दावा RBI कडून करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2022 पासून प्रत्येक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करताना 16 डिजीट नंबर ऑनलाईन वेबसाईटला द्यावा लागेल. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कंपन्या आता डेटा स्टोर करू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या डेटा सिक्योरिटीच्या नियमांतर्गत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कंपन्या डेटा स्टोर करू शकणार नाही.

टोकेनायजेशन

RBI कडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्विसला CoFT (Permitting Card on File Toknisation) म्हटलं जातं. याअंतर्गत वीजा, मास्टरकार्ड, रुपे कार्ड सारखे सर्विस प्रोवाइडर ग्राहकांचा कार्ड नंबर, सीवीवी आणि इतर डिटेल्सच्या जागी आता 16 अंकी नंबर जारी करतील, जो ग्राहकाच्या कार्डशी लिंक असेल. ग्राहक ऑनलाईन पेमेंट करताना कार्डचे डिटेल्स देण्याऐवजी 16 अंकी नंबरचे डिटेल्स द्यावे लागतील. त्याद्वारे पेमेंट होईल. या संपूर्ण प्रक्रियेत युजरचे कार्ड डिटेल्स सेव्ह होणार नाहीत. केवळ बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपनीकडेच युजरचे कार्ड डिटेल्स असतील.

असे मिळणार टोकन

सुरुवातीला टोकेनायजेशन सर्विस सर्वांसाठी अनिवार्य नसेल. युजर आपल्या इच्छेनुसार याचा वापर करू शकतात. युजरला आपल्या कार्डसाठी टोकन जनरेट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्याआधारे कार्ड कंपनी टोकन जनरेट करेल. या सर्विससाठी युजरला कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.

या टोकन नंबरचे केवळ शेवटचे चार नंबर आणि रुपे, विजा, मास्टरकार्ड यापैकी कोणतं कार्ड आहे इतकीच माहिती सेव्ह केली जाईल. त्याशिवाय इतर कोणतेही कार्ड डिटेल्स स्टोर केले जाणार नाहीत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here