फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य; अजित पवारांची टीका

0

मुंबई,दि.१०: भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर यांचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यात अलीकडच्या काळात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

अजित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या… आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.

“त्या काळात काही लोकांनी कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या. याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का? कुठले शब्द कसे वापरायचे? यांचं भान राखलं पाहिजे. अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात,” असंही अजित पवार म्हणाले.

उपस्थित नागरिकांना उद्देशून बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, “ही जी भाषा वापरली जातेय, ही बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं आणि कुणाला शेती बघायला लावायची, हे तुमच्या हातात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकाराअंतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे.”

चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभी केली असे म्हणालो. पण भीक म्हणजे काय, आज आपण गणपती, नवरात्री, आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीला जाऊन फिरतो, तेव्हा हेच म्हणतो ना, आम्हाला आमची जयंती साजरी करायची आहे, वर्गणी द्या. मी काल बोलताना खांद्यावरचा गमछा काढून भीक मागितल्याची ॲक्शन करून दाखवली. माझ्या भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे माझ्या रक्तात आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला रोज बातम्या मिळवण्यासाठी राजकीय वाद निर्माण करायचा असतो. पण माझ्या भाषणाचे वारकऱ्यांनी कौतुक केले, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here