गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार

0

घरगुती गॅस महाग होणार

दि.24 : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. सामान्य कुटुंबाचे वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे कंबरडं मोडलं आहे. सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सामान्य माणसाला आणखी एक फटका बसणार आहे. ग्राहकांना आता घरगुती एलपीजी सिलेंडरकरता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

एलपीजीला मिळणारी सबसिडी केंद सरकार बंद करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात अधिकृतरीत्या आदेश काढलेला नसला तरी सरकारच्या आंतरिक मूल्यांकनात ग्राहक एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यास सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीसंदर्भात सरकारमध्ये दोन विचार आहेत. पहिल्या योजनेत आहे तसे चालू द्यायचे आणि दुसऱ्यात उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्गालाच सबसिडी द्यायचा विचार आहे. अर्थात सबसिडी देण्यासंदर्भात अजूनही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

आर्थिक वर्ष 2020-21मध्ये सरकारने 3,559 कोटी रुपये सबसिडीच्या रूपात ग्राहकांना दिले होते. आर्थिक वर्ष 2019-2020मध्ये हा खर्च 24,468 कोटी इतका झाला होता. याचा अर्थ एकाच वर्षात सरकारने सबसिडीत सहा पटींनी कपात केली आहे. सध्याच्या नियमानुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर आपल्याला सबसिडीचा लाभ मिळणार नाही. तसेच मे 2020मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी बंद केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here