मुंबई,दि.2: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या. मोठ्या दिमाखात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर, निवडणुकांसाठी वाट्टेल ते केलं जातय, असे म्हणत शिवराज्याभिषेक आजच्या दिवशी झालाच नव्हता, कुणाच्या सुपीक डोक्यातून हा विचार बाहेर आला, असे म्हणत आव्हाड यांनी रायगडावर आज झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे, ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग, आज आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला, असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.
शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्यांनी माफी मागावी
निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्यांनी माफी मागावी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असे म्हटलं. तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण राज्यकारभार करत आहोत. शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होतं. त्यासाठी सरकार काम करत आहे. आपण प्रतापगड प्राधिकरण सुरू करत आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तर, प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे यांनी काम करावं, असंही शिंदे म्हणाले. तर, छत्रपतींच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.