कबुतराला खाऊ घातल्यामुळे गुन्हा दाखल 

0

मुंबई,दि.३: मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कबूतरांना मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई करण्यात आली होती. कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही माहीम येथे एका व्यक्तीने त्याचे उल्लंघन केले. माहीमच्या एल जे मार्गावर एके ठिकाणी कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कबूतरांना दाणे टाकले व तो निघून गेला. याबाबत पालिका कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यानंतर माहीम पोलिसांनी कबूतरांना दाणे घातले म्हणून गुन्हा नोंदवला आहे. अशाप्रकारे नोंद झालेला हा मुंबईतला पहिला गुन्हा आहे.

कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. 

कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये असे उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले. शिवाय पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासदेखील सांगितले होते. त्यानुसार माहीम पोलिसांनी कबूतरांना दाणे घालणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 223, 270, 271 बीएनएस अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका कारमधून एक व्यक्ती एल जे मार्गावर कबूतर असतात तिथे आली. त्याने कारमधून कबूतरांना दाणे टाकले आणि तो निघून गेला. हा प्रकार पाहिल्यानंतर पालिका कर्मचाऱ्याने माहीम पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

कबूतरांना दाणे टाकून निघून गेलेल्या व्यक्तीच्या कारचा नंबर पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्या कारच्या नंबरवरून कबूतरांना दाणे टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे माहीम पोलिसांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here