Jitendra Awhad: आमदार जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0

ठाणे,दि.१६: आमदार जितेंद्र आव्हाडांसह (Jitendra Awhad) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jitendra Awhad News) ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करताना कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. काल जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा यांनी मनपा सहाय्यक आयुक्त यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचाच असल्याचा दावा ऋता आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल | Jitendra Awhad News

महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत

आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकांवर कारवाई केल्याने तसेच त्यांचे ऐकले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे महेश आहेर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकावर हल्ला करणे, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे बुधवारी सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींना मारण्याची धमकी देतो का असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली होती. आहेर यांच्या बचावासाठी ते सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदुक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. याप्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.

दरम्यान आहेर यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर यांच्याविरोधात तक्रार दिल्याने, आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदार संघातील बेकायदा बांधकाम तोडल्याने आणि त्यांचे एेकले नाही म्हणून आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि इतर तीन जणांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच “आव्हाड साहेबांनी तुला संपवायला सांगितले आहे” असे सांगून मारहाण सुरू केली असेही तक्रारीत म्हटले आहे. हल्लेखोरांचा बंदूक आणि चाॅपरने वार करण्याचा उद्देश असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here