सोलापूर,दि.1 : घरातील व समाजातील ज्येष्ठांची काळजी घेणे ही केवळ आपली जबाबदारी नसून तो आपल्या संस्काराचा भाग आहे असे प्रतिपादन माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी केलेले आहे. लायन्स क्लब ऑफ सोलापूर च्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून हॉटेल समृद्ध येथे आयोजित केलेल्या “ज्येष्ठ नागरिक गौरव सोहळा” समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ सोलापूर चे अध्यक्ष गोविंद मंत्री होते तर सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी गोविंद मंत्री यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाबद्दल माहिती देऊन प्रत्येकाने आपापल्या घरातीलच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली तर समाजात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या उद्भवणार नाहीत असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते अप्पासाहेब कनाळे, सुधाकरराव पंढरपूकर, गुरुलिंगप्पा कन्नूरकर, हरिभाऊ जतकर, गणपतराव खरटमल, नागेश मोहिरे व महादेव माने या समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कनाळे, जतकर व खरटमल यांनी सत्कारा दाखल आपले प्रातीनीधीक मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी लायन्सच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून भविष्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. याप्रसंगी याप्रसंगी गोविंद लाहोटी, राजेंद्र शहा कासवा, रमेश जैन, भगवान जाधव, नरेंद्र गंभीरे, सुरेखा गंभीरे, सुरेखा मंत्री, राधिका सोनी अंजु मालू, संजय कोरे, दिनेश बिराजदार आदी उपस्थित होते. शेवटी क्लबच्या सचिवा नंदा लाहोटी यांनी आभार प्रदर्शन केले.