नवी दिल्ली, दि.5: Bulli Bai App Case: बुल्लीबाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तराखंड येथून 18 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले आहे. ही मुलगी उत्तराखंडची राहणारी आहे. क्राईम ब्रांच तिला ताब्यात घेऊन मुंबईला आणत आहे. आरोपी युवतीसोबत तिचा सहकारी विशाल कुमार हादेखील या षडयंत्रात सहभागी होता. आरोपी युवतीचं वय अवघं 18 वर्ष आहे तर विशाल कुमारचं वय 21 वर्ष आहे.
18 वर्षीय तरुणी या संपूर्ण कारस्थानामागील मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांचा संशय असून तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी विशालकुमार या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली असून त्याला मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशालकुमार हा तरुणीचा मित्र असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राने बुल्ली बाई अॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांविरोधात अपमानास्पद आणि अश्लिल गोष्टी पसरवल्या होत्या. मुस्लीम महिलांची बोली लावण्याचं कृत्य केले गेले. उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून 18 वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. ती 12 वीच्या वर्गात शिकते. मुंबई क्राईम ब्रांचने तिला अटक करत स्थानिक न्यायालयात हजर केले. त्याठिकाणी आरोपी युवतीला ट्रांजिट रिमांडमध्ये ठेवत टीम मुंबईसाठी रवाना झाली. बुधवारी टीम मुंबईला पोहचेल.
काय आहे प्रकरण?
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.