नवी दिल्ली,दि.28: Breaking News: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावालावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे.
व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये एकाच्या हातात तलवार दिसत होती. त्याने व्हॅनवर तलवारीने वार केले आणि व्हॅनचा दरवाजा उघडला. पण, तेवढ्यात पोलिस तिथे आले आणि त्यांनी बंदूक काढली. यावेळी हल्लेखोर म्हणाले- त्याला बाहेर काढा, आताच मारू…पोलिसांच्या सतर्कतेमुळे आफताबचा जीव वाचला.
आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ झाली. तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.

यावेळी नाराज जमावाने पोलिस व्हॅनवर दगडफेकही केली. यावेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे लोक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन व्हॅन काढली आणि आफताबला सुरक्षित नेले.