मुंबई,दि.14: Borivali Padgha: महाराष्ट्रातील एका गावाची चर्चा होत आहे. मुंबईपासून सुमारे 53 किलोमीटर अंतरावर असलेले ठाणे जिल्ह्यातील बोरिवली-पाडघा गाव गेल्या दशकापासून चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे केंद्रीय आणि राज्य सुरक्षा संस्थांकडून वारंवार होणारे छापे. एका छोट्याश्या गावामधून सक्तवसुली संचलनालयाला तब्बल 9 कोटी रुपयांचं घबाड सापडलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये 3 कोटी 70 लाखांची रोख रक्कम आणि 6 कोटींचं सोनं ईडीला सापडलं आहे. या रिकव्हरीमुळे एकच खळबळ उडाली असून तपास अधिकारीही थक्क झालेत.
गेल्या दोन वर्षांतच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), महाराष्ट्र एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी या गावात अनेक मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
या प्रकरणी बोरीवली-पडघा या जुळ्या गावांबरोबरच दिल्ली, कोलकाता, हजारीबाग (झारखंड) आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील विविध ठिकाणी ईडीने गुरुवारी छापे टाकले. इसिसचे पडघा येथील साथीदार तसेच या संघटनेचा भारतातील स्वयंघोषित नेता साकिब नाचनविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारच्या छापेमारीनंतर या प्रकरणाशीसंबंधित व्यक्तींची 25 बँक खाती ईडीने गोठवली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील पडघा गावात हा सारा मुद्देमाल सापडला आहे. याचा गावातील ‘इसिस’च्या मॉड्युलने स्थानिक राखीव जंगलातून खैर लाकूड अवैधरित्या तोडून त्याची तस्करी केली होती, अशी माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांशी संबंधित मनी लॉण्डिंग प्रकरणी ईडीने केलेल्या तपासादरम्यान पैशांच्या व्यवहाराचं हे कनेक्शन उघड झालं आहे. ईडीने शनिवारी यासंदर्भातील माहिती सार्वजनिक केली आहे.
बोरिवली-पडघाला मोठा इतिहास आहे. कागदोपत्री पुरावे शिलाहार राजवंशाच्या काळापासून आहेत, जेव्हा हा परिसर ७ व्या ते १० व्या शतकात उत्तर कोकण प्रशासनाचा भाग होता. १२ व्या शतकात, अरब व्यापारी भिवंडी बंदरातून आले आणि जवळच्या बोरिवली परिसरात स्थायिक झाले. हळूहळू, बोरिवली आणि पडघा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेले. लोकसंख्या प्रामुख्याने मुस्लिम आहे आणि हा समुदाय आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, गावाची लोकसंख्या ५,७८० आहे, ज्यापैकी अंदाजे ८३ टक्के मुस्लिम आहेत. मुल्ला, नाचन आणि खोत सारखी कुटुंबे त्यांच्या जमीन आणि लाकडाच्या व्यापारामुळे प्रभावशाली राहिली आहेत.







