मुंबई,दि.३१: Bombay High Court On Pigeons: मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनेकजण कबूतरांना खायला घालतात. मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई करण्यात आली होती. कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मनाई केली असताना खाद्य कसे घातले जाते असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने कबुतरांची पिसे, विष्ठा मानवी आरोग्यास धोकादायक असतानाही लोकांनी न्यायालयीन आदेश धुडकावत कबुतरांना खाद्य घातलेच कसे जाऊ शकते, असा जाब पालिका प्रशासनाला विचारला.
कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले.
कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. मात्र कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्य घालण्यापासून रोखू नये अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.