भाजपा अशी अवस्था करेल की एकनाथ शिंदे यांना चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल

0

मुंबई,दि.२७: भाजपा अशी अवस्था करेल की एकनाथ शिंदे यांना चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल अशी टीका काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपा आहे असा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अनेक मंडळांना, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच काँग्रेस खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, भाजप अशी अवस्था करून ठेवली आहे की, त्यांना थेट चारधाम यात्रेला जावे लागेल, असा टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. महंतांचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. यावरून काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी टीका केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत इम्रान प्रतापगढी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय जनता पक्षाने त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे की, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल, असा टोला प्रतापगढी यांनी यावेळी लगावला. मुंबई महानगपालिका निवडणुकांवर भाष्य करताना, आम्ही मुंबईत पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे ते म्हणतात. मात्र, आधी हे पाहिले पाहिजे की सध्याच्या सरकारमधले २२ आमदार कुठे जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तर फार लांबची बाब आहे, अशी टीकाही प्रतापगढी यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकरी आणि जनतेतील सरकारबाबतचा रोष दिसून येत आहे. राज्यातील खरा मुख्यमंत्री कोण असा सवालही विचारण्यात येत आहे. यावरून काँग्रेस खासदार प्रतापगढी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here