मुंबई,दि.27: भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल निकम हे 26/11 प्रकरणासह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये वकील होते. पूनम महाजन यांचे तिकीट रद्द करून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपमध्ये बराच काळ मंथन सुरू होते. या जागेवर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले आहे.
उज्ज्वल निकम दहशतवादावर ठाम भूमिका घेतात आणि त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. तसंच, ते अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कसाबला फाशी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भाजपा नेत्यांनी पूनम महाजन यांचे तिकीट रद्द करण्याचा निर्णय संघटनात्मक प्रतिक्रियेवर आधारित असल्याचे म्हटले आहे. पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाणार असे काही काळापासून संकेत असले तरी त्यांच्या जागी दुसरा उमेदवार निवडण्यात पक्षाने वेळ मारून नेली.
उज्ज्वल निकम हे पूनम महाजनचे वडील प्रमोद महाजन यांच्या खून खटल्यातही फिर्यादी होते. एप्रिल 2006 मध्ये वादानंतर प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण याने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. पूनम महाजन या भाजपच्या युवा शाखेच्या माजी अध्यक्षाही राहिल्या आहेत.