BJP MNS Alliance: भाजपा मनसे युतीवर रावसाहेब दानवे यांचं मोठं विधानं

0

मुंबई, दि.१०: भाजपा मनसे युतीवर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठं विधानं केलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही. यावरून मनसे भाजपा (BJP) युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी आणि आता रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे. या भेटीचं नेमकं कारण काय आणि राज ठाकरेंसोबत काय चर्चा झाली, याबद्दल रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली आहे.

“मुंबईत रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. यानंतर मी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत या झोपडपट्ट्या हटवू नये, असं म्हटलंय. तर, या झोपड्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच प्रमाणे मी राज ठाकरेंची भेट घेतली,” असं रावसाहेब दानवे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

“काळाच्या पोटात काय आहे, हे आता सांगण कठीण आहे. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखतंय. मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज ठाकरे बोललेत तर आघाडीमधील नेत्यांना चांगलं वाटतं, पण जर त्यांच्याविरोधात बोलले तर मात्र त्यांच्या पोटात दुखतं. एखाद्याच्या कामामुळे त्याच्याबद्दलचं मत बदलू शकतं. मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. परंतु आज त्यांच्यावर टीका केली, तर ते नाव ठेवायला लागले. अलिकडे झालेल्या निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्ये आम्ही जिंकली, त्याचं कौतुक फक्त राज ठाकरेंनी केलं. चांगल्या कामाचं कौतुक नको का करायला?” असा प्रश्न रावसाहेब दानवेंनी विचारला.

“राज ठाकरेंनी त्यांचं परप्रांतीयांबद्दलचं धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही मुद्दे सोडून द्यावे लागतात,” असं दानवे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here