दि.30: भाजपा (BJP) नेत्या सीमा पात्रा (Seema Patra) यांनी मोलकरणीला मारहाण करत मोलकरणीचा अमानुष छळ केला आहे. झारखंडचे निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची पत्नी भाजपा नेत्या सीमा पात्रा (Seema Patra) यांच्यावर 8 वर्षांपासून घरातील मोलकरणीचा छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या 8 वर्षांपासून सीमा यांच्या घरी एक अपंग मुलगी काम करत होती. असा आरोप आहे की सीमा तिला बेदम मारहाण करायची आणि खोलीत बंद करून ठेवायची.
भाजपा नेत्या सीमा पात्रा यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनीताने दिलेल्या माहितीनुसार, सीमा पात्रा यांनी तिला अनेक दिवसांपासून उपाशी ठेवलं, एका खोलीत बंद केलं. तसेच लोखंडी रॉडने मारून तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीरावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत.
सुनीताला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाहीतर सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मानचा मित्र विवेक बास्के याने मदत केली. आयुष्मानने विवेकला सांगितले होते की त्याची आई सीमा त्यांच्या घरातील नोकर सुनीताचा कसा छळ करते. सुनीताच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसल्याचं सांगण्यात येत आहे. तिला गरम तव्याने अनेक वेळा चटके देण्यात आले.
पोलिसांनी सुटका केल्यानंतर सुनीतावर सध्या रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा ती खूप अशक्त होती, हळूहळू तिची प्रकृती स्थिती सुधारत आहे. सुनीताने सांगितलं की, मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या सर्वातून वाचवलं. तिला एका खोलीत बंद केलं गेलं होतं. तिला कित्येक दिवस अन्न दिलं नाही, त्यामुळे ती खूप अशक्त झाली. तिला व्यवस्थित उभा राहता येत नसतानाही तिला काम करायला लावलं होतं.
पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्यापही सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काँग्रेस आमदार दीपिका सिंह पांडे यांनी ट्विटद्वारे भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या मोठ्या नेत्यांना टॅग केलं आहे.
“धिक्कार आहे तुमच्या नेत्या सीमा पात्रा यांचा, ज्यांनी ओलीस ठेवलेल्या महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. स्मृती इराणी कुठे आहेत, भाजपाचा महिला मोर्चा का झोपला आहे? रस्त्यावर उतरा आणि या महिलेसाठी कठोर शिक्षेची मागणी करा. महिला आयोग या महिलेच्या विरोधात कारवाई का करत नाही?” असं दीपिका सिंह पांडे यांनी म्हटलं आहे.