कथित समीर वानखेडे २५ कोटी खंडणी प्रकरणात मोठा खुलासा

0

मुंबई,दि.४: एनसीबीचे समीर वानखेडे यांनी क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातील पंच गोसावीच्या बॉडीगार्ड प्रभाकर साईलने आर्यन खानला ड्रग प्रकरणातून सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता. १८ कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली होती व यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना देण्यात येणार होते असाही दावा प्रभाकर साईलने केला होता.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला मोठं यश आलं आहे. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्यामुळे या प्रकरणात खंडणीचा गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलनं उघड केलेल्या माहितीला कुठेतरी दुजोरा मिळताना दिसत आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणात आता गुन्ह्याची नोंद करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

आर्यन खानला सोडवण्यासाठी मुंबईतील लोअर परळ याच भागात २५ कोटी रुपयांचं डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईल यानं केला होता. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एक धक्कादायक फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. यात मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडिज कार दिसून आली आहे. मुंबई पोलीस आता या पुराव्याच्या जोरावर पुजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदविण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Dadlani (@poojadadlani02)

मुंबईतील क्रूझ पार्टीवरील ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यानं पुढे येत एनसीबी, किरण गोसावीवर खळबळजनक आरोप केले आहेत. यात प्रभाकर साईल यानं आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली होती. यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत असं किरण गोसावी सॅम डिसोजा याला सांगत असल्याचं आपण ऐकलं होतं, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल यानं केला होता. पोलिसांनी याप्रकरणात चौकशीला सुरुवात केली असता लोअर परळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here