सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी AIMIMचा मोठा निर्णय

0

सोलापूर,दि.19: सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी AIMIMने (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्त्वाची असून देशातील संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी तसेच समाज भावना लक्षात घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडून उमेदवार देणार नसल्याची घोषणा सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला खुला पाठिंबा नाही मात्र जनता हुशार आहे, ज्या पक्षाला मतदान करायचे त्यांना करू द्या असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुती, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर एमआयएम आपला उमेदवार उतरवणार असून चार जण इच्छूक असल्याचे शहराध्यक्ष शाब्दींनी सांगितले होते. माजी आमदार रमेश कदम हे ही इच्छूक होते. त्यांनी दोन वेळा भेट घेतली मात्र उमेदवार निश्चित झाला नव्हता.

अखेर शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांनी बुधवारी शाब्दी नगर येथील निवास्थानी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली, शहर, जिल्ह्याचा आढावा घेतला आणि पक्षश्रेष्ठींना निर्णय कळवला. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार यंदाची लोकसभा एमआयएम लढवणार नसल्याचे शहराध्यक्ष शाब्दी यांनी सांगितले.

एमआयएमकडून 10 जण इच्छूक होते, त्यांच्यासोबत चर्चाही झाली होती. इंडिया आघाडीसोबत नसलो तरी संविधान वाचवण्यासाठी, त्याची रक्षणासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. जो पक्ष संविधान वाचवण्यासाठी काम करीत आहे, त्याच्यासोबत आम्ही राहणार आहेत. यावेळी त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे कार्यकर्ते  व समाज बांधव सत्सदविवेक बुद्धीने मतदान करतील याचा मला विश्वास आहे. उमेदवार न देण्याचा निर्णय कोणाच्या दबावात घेतला नसल्याचेही शाब्दी यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, गाझी जाहगिरदार यांच्यासह, सलीम पामा, नासिर मंगलगिरी, इलियाज शेख उपस्थित होते.

देशभरात केवळ तीन ठिकाणी उमेदवार

देशातील राजकीय व सामाजिक स्थिती लक्षात घेऊन एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद तेलंगणातील हैदराबाद तसेच बिहार राज्यातील किसनगंज लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्याच ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवल्याचे फारुख शाब्दि यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here