मुंबई,दि.1: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंच्या खासदाराने मोठा दावा केला आहे. राज्यातल्या महायुतीत तीन पक्षांचा समावेश असून कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार यावर चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाने चार ठिकाणी लढण्याचं जाहीर केलं आहे. तर भाजप 26 जागा लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी 11 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता शिंदे गट लोकसभेच्या 13 जागा लढवणार असल्याचं सांगत त्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा केली असल्याचा दावा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप 26 जागा तर अजित पवार आणि शिंदे गट 22 लोकसभेच्या जागा लढणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर महायुतीत काहीतरी बिनसलं असल्याची जोरदार चर्चा झाली. यावर खासदार हेमंत पाटील यांना विचारला असता आम्ही 13 जागा लढवणार असल्याची माहिती हेमंत पाटलांनी दिली. स्वतः शिंदे साहेबांनी अमित शहा यांच्याशी बोलणी करून 13 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे आम्ही 13 लोकसभेच्या जागा लढवणार आहोत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.
भाजप 26 जागा लढवणार
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे भाजपने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत घेत त्यासाठी आराखडा तयार केला आहे. भाजप राज्यातल्या 26 जागा लढणार असून अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी 11 जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाने आणि शिंदे गटाने आपली राजकीय ताकत जास्त असल्याचा दावा करत 11 पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही गटांना किती जागा द्यायच्या याबद्दल आता भाजप काय भूमिका घेणार याकडे पाहावं लागेल.
अजित पवार गटाने चार जागा जाहीर केल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील शिबिरात त्यांचा गट लोकसभेच्या 4 जागा लढवणार (Lok Sabha 4 seats) असल्याची घोषणा केली. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं. सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गटाकडून उमेदवार दिले जाणार असल्याने, पवार वि पवार असा सामना होणार आहे. सध्या बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील आणि शिरुरमधून अमोल कोल्हे खासदार आहेत. तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभेचे नेतृत्त्व करतात.