उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली,दि.15: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश दिले होते. दोन्ही गटांमध्ये पक्षावरील हक्कावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले होते. याविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिल्लीउच्च न्यायालयाने ठाकरे गटाने केलेली याचिका फेटाळून लावली आहे. 

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासंदर्भात सोमवारी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगालाही आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. 

शक्य तितक्या लवकर निर्णय घ्या

न्या. संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला या वादाचा शक्य तितक्या लवकर निवाडा करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश हे बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांकडूनक करण्यात आला होता. तर, यावर ठाकरेंचा पक्षावरील दावा आणि हक्क हे अद्यापही कायम असून निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय दिलेला नाही. निवडणूक आयोगाने या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि ठाकरेंनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल घ्यावी असे निर्देश आम्ही देऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून मी हा पक्ष चालवत आहे. निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसत आहे त्या आधारे निकाल दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही. मी माझ्या वडिलांनी दिलेले नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही, अशी बाजू वकिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावतीने न्यायालयात मांडली होती. दोन्ही गटांमध्ये पक्षावरील हक्कावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले होते. यानंतर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here