भिवंडी,दि.17: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी भिवंडीमधील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. शरद पवारांनी भाजपाच्या ‘अब की बार चारसौ पार’ घोषणेवरून जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला देशाची घटना बदलायची आहे, याकरिता भाजपाला 400 पेक्षा जास्त जागा पाहिजेत अशी टीका पवारांनी केली. कर्नाटकातील आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या खासदारानेही घटना बदलायचं आहे असे सांगितलं आहे, असे शरद पवार म्हणाले.
भाजपाच्या राजस्थानमधील नेत्यानेही तेच सांगितलं. त्यासाठी मोदींना मतं द्यायचं आहे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार संपवला जाईल, तेव्हा तुमच्यासारख्या कोट्यवधी लोकांचं अधिकाराचं अस्तित्व नष्ट होईल. त्या दिवशी देशात हुकूमशाही येईल, असं शरद पवार म्हणाले. Tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
अयोध्येतील मंदिर संकटात येईल…
उद्या आमच्या हातात सत्ता आली तर अयोध्येतील मंदिर संकटात येईल असं मोदी सांगत आहे. या देशातील मंदीर, मशीद, चर्च असो की इतर प्रार्थनास्थळं हे सुरक्षित आहेत. सुरक्षित राहील. पण मोदी काही कारण नसताना या विषयाला हात घालत आहेत. हे चुकीचं आणि गंभीर असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.