Bhaskar Jadhav On BJP: ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.4: Bhaskar Jadhav On BJP: ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई दौरा केला. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभेच्या जागांवर  चर्चा केली. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही आपल्या आमदार,खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकांची चर्चा झाली. आता, शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही शिवसेनेचीही तयारी सुरू असल्याचे सांगत काही गौप्यस्फोटही केले आहेत. भाजप शिंदे गटाला केवळ लोकसभेपुरतेच सोबत घेणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

भास्कर जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट | Bhaskar Jadhav On BJP

भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, काही सर्वेक्षणाच्या गोपनीय अहवालाचा दाखला देत, राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार, लोकसभेला केवल 7 जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील, असे जाधव यांनी म्हटले. भाजपने एक ताजं सर्वेक्षण केलेलं आहे. त्या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आणि शिंदे गटाला महाराष्ट्रात केवळ 7 जागा जिंकता येणार आहेत, त्याही अतिशय कमी मार्जिनने. यासह, दुसऱ्या एका गोपनीय अहवालानुसार भाजप विधानसभेच्या जागा शिंदे गटाला सोबत न घेता लढणार आहे. 

ज्या पद्धतीने 2014 साली भाजपने लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं. पण, विधानसभा निवडणुकांवेळी धोका दिला. त्याचप्रमाणे लोकसभेला ते शिंदेंना सोबत घेतील आणि विधानसभेला शिंदेंना बाजुला सारतील. त्यामुळे, शिंदेंची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होईल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. भाजपच्या गोपनीय अहवालानुसार विधानसभेला भाजपला महाराष्ट्रात केवळ 49 जागा जिंकता येतील, असा रिपोर्ट आहेत. तर, मुंबई महापालिकेत यंदा केवल 28 नगरसेवक निवडूक येतील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी एकत्रितपणे आगामी लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा फेटाळून लावला असून महाविकास आघाडी टिकणार नसल्याचं म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here