सोलापूर,दि.१९: अत्याचार केल्याप्रकरणी बिहारी तरुणास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी छट्टु रामपरवेश शर्मा रा. मुज्फफरपुर, बिहार यास अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये ५०,००० च्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला.
यात हकिकत अशी की, दिनांक १९/०६/२०२१ रोजी फिर्यादी व तिचा पती कामावर गेले असताना ते परत आले असता त्यांची अल्पवयीन मुलगी त्यांना घरी आढळून आली नाही. त्यामुळे यातील फिर्यादीने मुलगी हरवल्याची तक्रार संबंधित पोलिस स्टेशन ला दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
नंतर पोलीस तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, यातील आरोपी छट्टु शर्मा या बिहारी तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून लग्न केल्याचे समजले व त्यांना एक मुलगा असल्याचे समजले. त्यानुसार सदर पोलीसांनी सदर पिडीतेचा कसुन शोध घेतला असता त्यांना सदर पीडिता व आरोपी हे जयपुर, राजस्थान येथे एकत्रितरित्या राहत असल्याचा सुगावा लागला. त्याप्रमाणे पोलीसांनी सदर पीडीता व आरोपीस जयपूर येथून ताब्यात घेतले.
यातील आरोपी छट्टु शर्मा याने जामीन मिळण्याकामी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पीडितेचे वय पाहता तिस फूस लावण्याचा संबंध येत नाही. तसेच सदर आरोपी व पिडीतेचा एकत्रित सोलापुर ते जयपुर हा प्रवास पाहता पिडीतेचे अपहरण केले होते, असे म्हणता येणार नाही. सदरचा प्रकार निव्वळ प्रेम संबंधातून झालेला आहे. असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला.
त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश यांनी आरोपी छट्टु शर्मा रा. बिहार याची जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. फैय्याज शेख, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.