बदलापूर: बदलापूर येथील भाजप महिला शहराध्यक्षांच्या मुलीने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत भाजप महिला शहराध्यक्ष प्रतिभा जाधव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून, माध्यमांशी बोलताना आई-वडिलांना रडू कोसळले.
नेमके प्रकरण काय?
भाजप नेते महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांच्या मुलीने प्रभू श्रीराम यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर हिंदूत्ववादी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून, बदलापूर पोलीस स्टेशनबाहेर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
• पोलीस कारवाई: आक्षेपार्ह विधानाप्रकरणी बदलापूर पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून कायदेशीर तपास सुरू केला आहे.
• राजकीय पडसाद: या कृत्याचा निषेध करत कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे उद्धव ठाकरे गटाकडून कठोर कारवाईसाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आई-वडिलांना रडू कोसळलं
राज्यभरातून होणाऱ्या टीकेनंतर महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दोघांनाही रडू कोसळलं. त्यांनी सांगितले की: “आम्ही रामाचे भक्त आहोत. आमच्या घरात देव्हारा असून आम्ही नियमित पूजा-अर्चा करतो. शहरात होणाऱ्या प्रत्येक हिंदू सणात आम्ही हिरीरीने सहभागी होतो, मात्र मुलीच्या या कृत्यामुळे आम्हाला समाजात मान खाली घालावी लागत आहे.”
नैतिक जबाबदारी स्वीकारत ‘राजीनामा’
मुलीने केलेल्या प्रभू श्रीरामांच्या अपमानाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रतिभा जाधव यांनी भाजप महिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये आणि या कृत्याचा आम्ही निषेध करतो, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.








