Bachchu Kadu: बच्चू कडूंनी केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक

0

मुंबई,दि.9: आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कौतुक केले आहे. आमदार बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत. यापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या आसपासच्या नेतेमंडळी आणि उच्चपदस्थांबाबत आरोप आणि दावे केले जात आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) देखील लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आणि आता शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही 9 शी बोलताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाच्या अपेक्षेविषयीही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही

एकनाथ शिंदेंच्या माध्यमातूनच आपण उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता, अशी आठवण यावेळी बच्चू कडूंनी सांगितली. “आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, तेव्हा शिंदेंच्या मार्फतच गेलो होतो. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी शब्दही पाळला. उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही. त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे. पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय. ज्या ताकदीनं ते मातोश्रीवरून काम करत होते, त्या ताकदीनं ते वर्षावरून करू शकले नाहीत”, अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे.

यासाठी सुरतला गेलो होतो

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपण सूरतला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी नसून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट होऊ शकेल का? हे पाहाण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा केला आहे. “मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण त्यांचा फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग मला वाटलं की शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधता येईल का? त्यासाठी आम्ही सूरतला गेलो. पण तोपर्यंत तिथे आमदारांची संख्या 29-30 पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आलं की तिथे कुणाची समेटाची मानसिकता नव्हती. सत्तास्थापनेनंतरच तिथून निघण्याची प्रत्येकाची भूमिका होती”, असं बच्चू कडू म्हणाले.

“कोण बंडखोरी करत नाही?”

दरम्यान, सगळेच बंडखोरी करतात, असं म्हणत बच्चू कडूंनी शिंदे गटाच्या बंडखोरीचं समर्थन केलं आहे. “बंडखोरी ही प्रत्येकात असली पाहिजे. बंडखोरीच माणसाला जिवंत ठेवते. गीता संस्कृतमध्ये होती. ती मराठीत करण्याचा उठाव ज्ञानेश्वरांनी केला. शरद पवारांनी ३८ वर्षांपूर्वी ३८ आमदार फोडले आणि तिथे बंडखोरी केली. बंड कोण करत नाही?” असा सवाल बच्चू कडूंनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here