ठाणे,दि.५: महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीवरून मनसे व शिवसेनेने (ठाकरे गट) जोरदार टीका केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांनी, ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी उचलले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप बंगल्यावर नेले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले, असा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यातील विक्रांत घाग या शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. ठाण्यात शिंदे गटाचे सहा जण बिनविरोध निवडून आले असून ठाणे महापालिकेची निवडणूक लढवणाऱया शिवसेना व मनसेच्या अधिकृत उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत आमच्या उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे.
विक्रांत घाग यांनी किसननगर, पडवळनगर येथील प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून यावेत यासाठी रात्रीपासूनच धमकी सत्र सुरू झाले होते. घाग यांना 2 जानेवारी रोजी पोलिसांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ बंगल्यावर नेले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे विचारे व जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी विक्रांत घाग यांना शिंदे यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्तात नेत असल्याचा व्हिडीओ पुरावाच दाखवला.
5 कोटींची ऑफर
कोपरी येथील मनसेच्या महिला उमेदवार राजश्री नाईक यांचे पती सुनील नाईक यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर सत्ताधारी पक्षातील एका बडय़ा नेत्याने दिली असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच मशाल चिन्हावरील एका महिला उमेदवाराच्या घरी पोलीस का गेले? त्यांच्या पतीची चौकशी का करण्यात आली? त्यांना अनेकजण रात्रभर का शोधत होते? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. साताऱयाच्या ड्रग्ज फॅक्टरीतून मिळालेला पैसा अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी दिल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.








