Atique Ahmed Killed: कुख्यात गुंड अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या

0

प्रयागराज,दि.16: Atique Ahmed Killed: कुख्यात गुंड अतिक अहमद आणि अशरफ अहमदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींची अशी हत्या करण्यात आल्याने उत्तर प्रदेश संपूर्ण देश हादरून गेला आहे.

कुख्यात गुंड अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या | Atique Ahmed Killed

आरोपी अतिक आणि अशरफ यांना पोलीस काल (15 एप्रिल) वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. जेव्हा हे दोन्ही आरोपी समोर आले तेव्हा मीडियाच्या काही लोकांना त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवलं. त्याचवेळी अचानक अतिक आणि अशरफ यांच्यावर सनी, लवलेश आणि अरुण यांनी बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

गोळीबाराची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आले. 2005 मधील उमेश पाल खून खटल्याच्या सुनावणीसाठी या दोघांना येथे आणण्यात आले होते. 13 एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या पोलिस चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि एक साथीदार मारला गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील कॉल्विन हॉस्पिटलजवळ पोलिसांचे पथक अतिक आणि अहमद यांना घेऊन जात असताना हा हल्ला झाला. दरम्यान, तीन हल्लेखोर अचानक तिथे पोहोचले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले. हा संपूर्ण हल्ला मीडिया आणि पोलिसांसमोर करण्यात आला आहे. दोघांवर गोळीबार झाला तेव्हाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात एक पोलीस हवालदारही जखमी झाला असून त्याचे नाव मान सिंह आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर तिघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तिघेही पोलिसांना स्वाधीन झाले. गोळीबार करताना ते तिघेही जय श्रीराम अशा घोषणा देत होते. या ठिकाणी न्यूज चॅनेल्सचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. 

अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीने बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी एका हल्लेखोराच्या नातेवाईकांला अतिकने मारले होते, त्यामुळे आता मी हल्ला केल्याची माहिती एका हल्लेखोराने पोलिसांना दिली आहे. पोलीस याबाबत आता अधिक तपास करत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here