तरुणावर प्राणघातक हल्ला, भाजपा नगरसेवक सुनील कामाठीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.११: सोलापूर येथील मुख्यालयाशेजारी पोलीस असलेल्या भगवाननगरात तरुणावर लोखंडी रॉड, काठी व विटाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवका सुनील कामाठीसह सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संजय काशीनाथ आडगळे ( वय ३९ , रा. भगवाननगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक सुनील कामाठी, आकाश चव्हाण, गणेश कामाठी, शिवा कामाठी, आकाश कामाठी, महेश पवार, महेश बनसोडे ( सर्व रा. सोलापूर ) यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजय आढगळे हे त्यांचा मित्र राम जाधव यांच्या वाढदिवसाकरिता मुरारजी पेठेतील कांचन गॅरेजजवळ गेले होते. त्यावेळी आरोपी नगरसेवक सुनील कामाठीसह इतर तेथे आले व त्यांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्या. काही वेळाने सर्वजण फिर्यादीजवळ आले. त्यावेळी त्यांनी त्यास तेथून बाहेर चल तुला सोडत नाही, तुला हिसका दाखवतो, तू आमच्या पप्पांना सोडून दुसऱ्या पक्षात गेलास, तुला सोडत नाही तुझी आज गेम करणार, अशी धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादी त्यांची नजर चुकवून घाबरुन घराकडे आला. वाटेत त्याला मोबाइलवरून धमकी देण्यात आली. रात्री पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र संदीप वाडेकर हे बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी हे वाहनांचे हॉर्न वाजवत तेथे आले व त्यांनी रिक्षामध्ये बसलेल्या फिर्यादीला बाहेर ओढले व विटा, काठी, लोखंडी रॉड, फरशी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी संदीप वाडेकर याने सोडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यास तू मध्ये येऊ नको, तुझा काही संबंध नाही असे सांगितले.

आकाश चव्हाण याने आणलेली तलवार सुनील कामाठी यांनी घेऊन तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुझे तुकडे करून खलास करून फेकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here