मुंबई,दि.8: भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून आशिष शेलार यांना धमकी देण्यात येत होती. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली होती.
याबाबत आशिष शेलार यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही केली होती. त्यानंतर शेलार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. गुन्हे शाखा आता आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय.
आरोपीला अटक
ओसामा समशेर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय 48 वर्षे आहे. गुन्हे शाखा आता या आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय. शेलार यांच्या वतीनं वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा जमिनीबाबतचा एक वाद आहे आणि या वादामागे आशिष शेलार यांचा हात असल्याचा संशय या आरोपीला होता. त्यातूनच त्याने शेलार यांनी धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.