मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना चॅलेंज

0

मुंबई,दि.12: भारतीय जनता पार्टीने मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे. भाजपा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेवर भाजपाची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तसंच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना ओपन चॅलेंज देखील दिलं.

भाजपाकडून माजी नगरसेवकांना आमिष दाखवून ऑपरेशन लोटस चालवलं जात आहे त्यास बळी पडू नये असं आवाहन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. याबाबत शेलार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. “अरविंद सावंत यांना माझं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी आधी स्वत:ची खासदारकी टिकवावी. ज्यावेळी आमचं ऑपरेशन सुरू होईल तेव्हा मुंबईत सर्वात आधी अरविंद सावंत याचं संस्थान खालसा होईल. त्यांनी स्वत:च्या जीवावर येणारी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवावी. त्यांनी आपली खासदारकी टिकवली तरी खूप आहे”, असं आशिष शेलार म्हणाले. 

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी केली त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि माझे सहकारी करू. आजच सर्व विषय बोलणार नाही. दिवस पावसाचे आहेत. पण वारंवार वर्षांनुवर्षे ज्या कंत्राटदारांना पोसलं आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसलं ते खड्ड्यांपासून हा झटकू शकत नाहीत. सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे नेते हात झटकू शकत नाहीत.  निकृष्ट दर्जाचं कोस्टल रोडचं काम, मेट्रो-३ मध्ये केलेला अहंकार यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड टाकला आहे. त्यापासून शिवसेना हात झटकू शकत नाही, असा टोला शेलार यांनी लगावला. 

आशिष शेलार पुढे म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत मुंबईबाबत तुम्ही जे चित्र तुम्ही डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल. आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद निश्चितच मिळेल. आमचं ठरलंय, भ्रष्ट व्यवस्थेनं बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील खऱ्या विकासाच्या मुंबईचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे. मुंबई महानगरपालिकेत आमचं टार्गेट हे महापौरपद आहे. त्याबाबत आवश्यक नगरसेवक निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here