सोलापूर,दि.24: Ashadhi Wari: चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत ‘भक्ती रसात’ चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन | Ashadhi Wari
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.
हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8.30 वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नेत्रदीपक रिंगण सोहळा
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.
हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी, वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमेरिकन राजदूताची उपस्थिती
सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थितीत होते.