सोलापूर,दि.९: Asaduddin Owaisi Solapur: ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापुरात मोठे विधान केले आहे. एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना ओवैसी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी यावेळी पाकिस्तानच्या संविधानाचाही उल्लेख केला.
पाकिस्तानात फक्त मुस्लिम धर्मातील व्यक्तींच पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतात. इतर कोणत्याही धर्मातील व्यक्ती होऊ शकत नाही. “पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण हा दिवस एक ना एक दिवस नक्की येईल.” असे ओवैसी म्हणाले.
असदुद्दीन ओवेसी यांची सोलापुरातील नई जिंदगी चौकात प्रचार सभा झाली. त्या सभेत ओवेसींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे नई जिंदगी परिसराचा तिरस्कार करतात. पण हा परिसर असदुद्दीन ओवोसींना पसंत आहे. या लोकांनी नई जिंदगी परिसरास वेडंवाकडं म्हटलं तर मी त्यांच्या बापाला बोलेन, याचं त्यांनी भान ठेवावं.








